Friday, September 10, 2010

परमेश्वरावर श्रद्धा असावी काय?

ख्रिश्चन धर्मातील कोर्स ऑफ मिराक्ल्स मध्ये एक वाक्य आहे "जर तुम्ही निवडलेल्या मार्गावर तुम्ही चालत असताना तुमच्या सोबत कोण चालत आहे हे तुम्हाला माहित असेल तर तुम्हाला आयुष्यात कोणत्याच गोष्टीची भीती वाटणार नाही". देव आहे कि नाही आपणाला माहित नाही परन्तू कोणी तरी सर्व शक्तिमान माझ्या सोबत आहे असा विश्वास आपल्याला अनेक संकटांशी मुकाबला करण्याचे सामर्थ्य देतो. हा विश्वास, योग्य निर्णय घेण्याची क्षमता व आत्मविश्वास यांच्या सहाय्याने आपण यशस्वी होतो. कोर्स ऑफ मिराक्ल्स मधील हे वाक्य दैववादी नाही हे लक्षात घ्या कारण त्यात तुम्ही निवडलेल्या मार्गावर तुम्ही चालत असताना असे म्हटले आहे म्हणजे मार्ग निवडण्याचे स्वातंत्र्य आपल्याला दिलेले आहे. कोणी तरी सर्व शक्तिमान माझ्या सोबत आहे असा विश्वास आपल्याला कसा उपयोगी ठरतो ते पुढील काही कथांच्या सहाय्याने आपल्याला लक्षात येईल.
पहिली गोष्ट. एकदा एक माणूस वाळवंटातून एकटाच चालला होता. त्याच्या लक्षात आले कि त्याच्या पावलांच्या बाजूला अजून दुसऱ्या पावलांच्या खुणा होत्या. त्याने भीतीने विचारले "कोण आहे?". उत्तर मिळाले "अरे मी परमेश्वर, मी सदैव तुझ्या बरोबरच आहे". तेवढ्यात त्या वाळवंटात एक वादळ आले. चालणे सुद्धा कठीण झाले. आता त्या माणसाच्या लक्षात आले कि आता वाळूत एकाच व्यक्तीच्या पाऊलखुणा आहेत. वादळ थांबले परत वाळूत दोन व्यक्तीच्या पाऊलखुणा दिसू लागल्या. तेव्हा तो माणूस म्हणाला "अरे परमेश्वरा जेव्हा तुझी मला संकटात आवश्यकता होती तेव्हा तू माझ्याबरोबर नव्हतास". परमेश्वर म्हणाला "अरे मी तुझ्या बरोबरच होतो". तो माणूस म्हणाला "अरे वाळूत केवळ माझ्याच पाऊलखुणा होत्या". त्यावर परमेश्वर म्हणाला "अरे त्या पाऊलखुणा तुझ्या नाही माझ्या होत्या. मी तुला वादळात उचलून घेतले होते". परमेश्वर सतत आपल्या सोबत असतो यावर माझा विश्वास आहे. तेव्हा मला कोणत्याही संकटाची भीती वाटत नाही. अनेकदा नेहमीच्या आयुष्यातील बदलांना आपण संकट समजतो. हा बदल नियती आपल्या प्रगतीसाठी आणत असते पण आपण हे संकट समजतो. प्रत्येक संकटात (Problem) त्याची उकलही (Solution) सामावलेली असते व ती ओळखता आली पाहिजे.
दुसरी गोष्ट एका जंगलातील आहे. एका जंगलात तीन झाडे होती. त्या तीन झाडामधील हा संवाद आहे. पाहिले झाड म्हणाले "बघा माझा बुंधा किती तरी सुंदर आहे. त्यापासून कोणीतरी एक सुंदर पाळणा बनवेल व जगाचा राजकुमार त्या पाळण्यात शांत निद्रा घेईल". दुसरे झाड म्हणाले "माझा बुंधा पसरट व उंच आहे यापासून सुंदर फळ्या बनविता येतील व या फळ्यापासून सुंदर जहाज बनेल व जगाचा राजपुत्र या जहाजात बसून जलविहार करेल". तिसरे झाड म्हणाले "माझा बुंधा खूप उंचच उंच आहे मी आणखी उंच होईन एके दिवशी आकाशातील परमेश्वर माझ्या बरोबर असेल". बरेच दिवस गेले एक लाकुडतोड्या त्या जंगलात आला त्याने ती तीन झाडे तोडली व त्यांचे मोठे ओंडके आपल्या घरी घेऊन गेला. पहिल्या झाडाच्या बुन्ध्याचे त्याने तुकडे केले व त्यांच्या त्याने घोड्यांचे खाणे ठेवण्यासाठी गव्हाणी केल्या. दुसऱ्या झाडाच्या बुंध्याच्या छोट्या फळ्या कापून त्यांची छोटी होडकी तयार केली. तिसऱ्या झाडाच्या त्याने लांब फळ्या कापून नंतर कधी तरी वापरता येतील म्हणून बाजूला ठेवल्या.
एक दिवस त्या घोड्याच्या तबेल्यात एक जोडपे आले. त्या स्त्रीने एका सुंदर बालकाला जन्म त्या तबेल्यात दिला. त्या बालकाला कोठे ठेवायचे म्हणून त्या माणसाने तेथील एक गव्हाणी उचलली (हि गव्हाणी त्या लाकूडतोडयाने पहिल्या झाडापासून बनविलेली होती) त्यात थोडे गवत टाकले व त्या बालकाला आत ठेवले. ते बालक त्या गव्हाणीत शांतपणे झोपी गेले.
हेच बालक पुढे मोठे झाले त्याने नवीन धार्मिक कल्पना मांडल्या जुन्या कल्पनांना विरोध केला. त्यामुळे त्याला बराच विरोध झाला त्याला तेथून निघून जावे लागले व त्या साठी त्या राज्यातील हद्द पार करताना त्याला नदी पार करावी लागली व नदी पार करताना त्याने छोट्या होडक्याचा (हे होडके त्या लाकूडतोडयाने दुसऱ्या झाडापासून बनविले होते) वापर केला. त्याला नंतर पकडण्यात आले व धर्माच्या विरोधात बोलणारयाना जरब बसावी म्हणून त्याला उंच जागी टांगून त्याच्या अंगावर खिळे ठोकण्याची शिक्षा देण्यात आली. त्यासाठी तिसऱ्या झाडाच्या फळ्या वापरून क्रॉस बनविण्यात आला व त्याचा वापर करून या शिक्षेची अंमलबजावणी करण्यात आली.
हे बालक म्हणजे येशू ख्रिस्त. आकाशातल्या बापाचा पुत्र म्हणजे जगाचा राजकुमारच. म्हणजे या तिन्ही झाडांच्या इच्छा पूर्ण झाल्या. पहिल्या झाडापासून तयार झालेल्या गव्हाणीत जगाचा राजकुमार झोपला. दुसऱ्या झाडापासून तयार झालेल्या होडक्यातून जगाच्या राजकुमाराने प्रवास केला. तर तिसऱ्या झाडाच्या इच्छेनुसार प्रत्यक्ष परमेश्वर त्याच्या बरोबर होता. हे श्रद्धा व विश्वास याचे उत्तम उदाहरण आहे.
तिसरी गोष्ट आहे एका देवावारती प्रचंड श्रद्धा असणाऱ्या माणसाची. एका गावातील माणसाची देवावारती प्रचंड श्रद्धा होती. कुठल्याही कठीण प्रसंगात देव आपल्याला मदत करेल याची त्याला खात्री होती. एकदा त्या गावात पूर आला. गावात पाणी शिरले. तो माणूस निर्धास्त होता. एक गावकरी त्याच्याकडे आला व म्हणाला "अरे गावात पाणी भरत आहे चल माझ्याबरोबर". तो माणूस म्हणाला "मला भीती नाही, परमेश्वर मला वाचवेल". आता पाणी कमरेपर्यंत वाढले होते. एक होडीवाला त्याच्याकडे आला म्हणाला "बस या होडीत". तो माणूस म्हणाला "मला भीती नाही, परमेश्वर मला वाचवेल". आता पाणी घराच्या छतापर्यंत पोचले. तो माणूस घराच्या छतावर चढला. तेवढ्यात एक helicopter आले त्यातल्या चालकाने एक दोर खाली टाकला व त्या माणसाला तो दोर पकडण्यासाठी सांगितले. पण त्या माणसाने नकार दिला व म्हणाला "मला भीती नाही, परमेश्वर मला वाचवेल". पुढे पाणी वाढून तो माणूस बुडून मेला. स्वर्गात गेल्यावर त्याने देवाला विचारले "अरे तुझ्यावर माझी श्रद्धा आहे तरी तू मला वाचविले नाहीस". देव म्हणाला अरे "मी तुला वाचविण्याचा प्रयत्न तीनवेळा केला पण तू त्याला योग्य प्रतिसाद दिला नाहीस. त्यामुळे जे झाले त्याला तूच जबाबदार आहेस". या गोष्टीवरून आपण हे समजणे आवश्यक आहे कि श्रद्धेचा अतिरेक असू नये. परमेश्वर योग्य संधी देतच असतो आपण त्या संधींना ओळखून योग्य फायदा करून घेतला पाहिजे.
आता एक विनोदी गोष्ट. एक दिवस एक माणूस चर्चच्या छताचे दुरुस्तीचे काम करत होता. तोल जाऊन तो खाली पडला त्याला काहीही झाले नाही . चर्चचे फादर त्याच्या जवळ आले व म्हणाले "वाचलास कारण परमेश्वर तुझ्याबरोबर होता". तेव्हा तो माणूस म्हणाला "कोणीतरी असलाच पाहिजे ज्याने धक्का देऊन मला पाडले"

श्रद्धा अंधश्रद्धा होणार नाही याची काळजी घ्या. परमेश्वरावर श्रद्धा ठेऊन आपण जगत असलो तरी मार्ग आपल्याला निवडायचा आहे, निर्णय आपल्याला घ्यायचा आहे हे विसरू नका. मार्ग निवडणे व निर्णय घेणे हे परमेश्वराचे काम नाही हे लक्षात ठेवा.