Tuesday, August 31, 2010

एखादी चूक अनावधानाने घडली तर काय?

हि कथा रशियातील बर्फाळ प्रदेश सैबेरिया या भागातील आहे. तो वर्षातील सर्वात थंड दिवस होता. तसे वर्षभर हा प्रदेश पूर्ण बर्फाच्छादित असतो पण त्या दिवशी खूपच थंडी होती. एक छोटा पक्षी एका खडकाच्या कपारीत थंडीने अर्धमेल्या अवस्थेत पडला होता. बरेच दिवस त्याला काही खायला मिळाले नव्हते. आज पाणी पण प्यायला मिळाले नव्हते. त्याची मृत्यूची वेळ जवळ आली होती. त्याचे प्राण न्यायला यमदूतही आले पण कोण जाणे ते त्या पक्षाचे प्राण नेत नव्हते. तेथून जाणाऱ्या एका गरुडाने ते पाहिले. त्याने विचार केला मी तर पक्षांचा राजा आणि बलवान आहे. या पक्षाचा जीव वाचविणे माझे कर्तव्य आहे. तो त्या पक्षाच्या समोर बसला. कसेबसे त्या मृतप्राय पक्षाला त्याने आपल्या पाठीवर बसविले. तेथून उडून गरुड एका उबदार प्रदेशात घेऊन आला. त्याने त्या पक्षाला एका मऊ जागी उतरवले. जवळून काही किडे मारून त्या पक्षाला खायला दिले. पक्षी ते खाऊन तरतरीत झाला त्याला ताकद आली. तो आता उडू शकत होता.
तेवढ्यात यमदूत परत त्या ठिकाणी आले व त्या पक्षाचे प्राण घेउन निघाले. पक्षी आता मेला होता. हे पाहून गरुडाला राग आला त्याने यमदूताना विचारले "अरे जेव्हा त्या थंड प्रदेशात हा अर्धमेला होता तेव्हा तुम्ही त्याचे प्राण नेले नाहीत पण आता तो पक्षी बरा झाल्यानंतर तुम्ही त्याला मारता हे योग्य नाही अरे मारायचे होते तर त्या थंड प्रदेशातच मारायचे होते". त्यावर यमदूत म्हणाले "अरे याचे मरण या उबदार प्रदेशातच होणार होते व तो पूर्ण बरा असतानाच व या क्षणालाच होणार होते. तू त्याला या प्रदेशात आणलेस व त्याला खायला दिलेस त्याला पूर्ण बरे केलेस. आणि या पक्षाचे मरण ठरल्या प्रमाणे झाले".
आता गरुड रडू लागला व म्हणाला "हे मी काय केले. मी त्या पक्षाच्या मरणाला कारणीभूत झालो". त्यावर यमदूत म्हणाले "तू शोक करू नकोस तू फक्त कारण झालास हे होणारच होते. तू नाही तरी अजून कोणीतरी हे करणारच होते हे ऐकून गरुड़ शांत झाला
त्यामुळे आयुष्यात अनावधानाने काही कृती आपल्याकडून घडून दुसऱ्याचे काही नुकसान झाल्यास आपण फक्त कारण असतो तर ते त्या व्यक्तीचे भाग्याविधान असते. यामुळे या घटनेबद्दल आयुष्यभर आपण अपराधीपणाची भावना ठेवणे चुकीची आहे. हि भावना फक्त त्या क्षणापुरती ठीक आहे पण तिच्यापासून लवकरात लवकर मुक्त होणे आवश्यक आहे. परंतु एखादी कृती आपण मुद्दामहून व जाणतेपणे करत असू तर ते आपले कर्म होते व प्रत्येक क्रियेला तितकीच तीव्र प्रतिक्रिया असते हे विचारात घेतले तर या कर्माचे भोग आपल्याला भोगावे लागतात. त्या मुळे कोणतीही कृती जाणतेपणी करताना त्या सर्व परिणामाचा विचार करा. बऱ्याचदा आतला आवाज (Sub Conscious Mind ) हा आपल्याला योग्य मार्ग दाखवितो. काही वेळा अशा घटना आपल्याला व त्या व्यक्तीला त्याच्या कर्मातून मुक्त होण्यासाठी घडतात. कर्माचा सिद्धांत आपण पुढे पाहणारच आहोत.

No comments:

Post a Comment